समर्थ

रामदास रामदास । हाचि सदा निदिध्यास ।
लागावा तो रात्रंदिस । आपुल्या मना ।।

rss-hero-content-bottom-img
charitra-home-img

शिवसमर्थ योग

सद्गुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी आणि श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज ही हिंदुस्थानची अद्वितीय नररत्ने आहेत. सुमारे ३५० वर्षे अखंडितपणे काळालाही पराभूत करून पिढ्यानपिढ्या हे दोन्ही महापुरुष लक्षावधी जनांच्या हृद्यसिंहासनावर विराजमान आहेत. बलशाली समर्थ हिंदुस्थान निर्मीत्तीसाठी आवश्यक असणारी संजीवनी या महापुरुषांच्या चरित्र व विचारात आहे. आर्य , सनातन , वैदिक , हिंदू , महाराष्ट्रधर्म या नामविशेषांनी ओळखला जाणार धर्म व संस्कृती जाणून घ्यायची असेल तर या राष्ट्रपुरुषांचे चरित्र, विचार आणि क्रांती यांचा अभ्यास करणे आगत्याचे आहे. श्रीशिवछत्रपती आणि श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या चरित्रातील समान सूत्र एका शब्दात सांगावयाचे झाल्यास ‘विवेक’ असे सांगता येईल. या दोघांचीही प्रखर स्वधर्मनिष्ठा कधीही धर्मांधतेत, परधर्मावर अन्याय करण्यात परिणत झाली नाही. तसेच परधर्मसहिष्णूतेच्या भावनेचा अतिरेक होऊन स्वधर्मविघातक विचार, कृती आणि प्रवृत्ती यांना त्यांनी किंचितही थारा दिला नाही .

योद्धा संन्यासी - राष्ट्रगुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी

श्रीसमर्थ रामदासस्वामींचा महिमा श्रीशिवछत्रपती, छत्रपती शंभूराजे, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपतींचे पुढील उत्तराधिकारी यांच्या कृती व शब्द यातून व्यक्त होतो. श्रीशिवछत्रपतींनी तत्कालीन विविध सत्पुरुषांना इनामे दिली. परंतु किल्ला दिला नाही. श्रीसमर्थांना मात्र सज्जनगडावर राहण्याची विनंती केली . अखेरची सहा वर्षे श्रीसमर्थ श्रीशिवरायांच्या इच्छेमुळे सज्जनगडावर राहिले. स्वराज्याच्या वतीने सज्जनगड व श्रीसमर्थांच्या संस्थानाची व्यवस्था पहिली जात असे. श्रीशिवाजी महाराजांपासून छत्रपतींचे सातारा राज्य खालसा होईपर्यंत ही व्यवस्था अशीच चालू होती.


श्रीसद्गुरुवर्य, श्रीसकलतीर्थरूप ही शिवछत्रपतींनी श्रीसमर्थांना उद्देशून लावलेली विशेषणे चाफळच्या सनदेत आहेत. श्रीसमर्थांच्या निर्याणाच्या पश्चात श्रीसंभाजी महाराजांनी श्रीसमर्थांचे समाधीमंदिर बांधविले . तेव्हा समर्थशिष्य श्रीदिवाकर गोसावींना लिहिलेल्या पत्रात श्रीसंभाजी महाराज म्हणतात ,’श्रीस्वामींनी सज्जनगडी पूर्णावतार केला.’( अवतार पूर्ण केला.) श्रीसमर्थशिष्य दिवाकरांनी श्रीसंभाजीराजांच्या पत्नी सौभाग्यवती महाराणी येसूबाई साहेब ‘ तीर्थरूप ‘ असे संबोधतात. तर सज्जनगडावरील संस्थानचे अधिकारी स्वामी – समर्थांच्या घराण्यातील वंशज श्रीलक्ष्मण स्वामींना दिलेल्या सनदेत छत्रपती शाहू महाराज म्हणतात – ’ श्रीलक्ष्मण बाबा यांचे चरणी शाहू राजे चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना…’ छत्रपती श्री शाहू राजे यांच्या पत्नी सौभाग्यवती सकवारबाईसाहेब श्रीमुद्गल स्वामींना ‘ गुरुबाबा ‘ असे संबोधतात. छत्रपती राजाराम महाराज पत्रात म्हणतात , ‘ हे संस्थान बहुत थोर . येथील चालविणे आम्हास अगत्य .’ थोरले प्रतापसिंह छत्रपती आपल्या रोजनिशीमध्ये श्रीसज्जनगडाची नोंद ‘ गुरुंची जागा ‘ अशी करतात. श्रीशिवछत्रपती हिंदवी स्वराज्याचे अष्टप्रधान मंडळ आणि तात्कालीन छत्रपतींच्या अनेक सरदारांनी अशा पद्धतीने श्रीसमर्थ व त्यांच्या परंपरेचा आदर करावा, असाच अफाट व्याप, कर्तव्य श्रीसमर्थांनी केले होते.

हिंदवी स्वराज्य योग

आजवर भारताला कर्म, भक्ती, ज्ञान, ध्यान, आदि योगांची महत्ता माहिती आहेच. परंतू , श्रीशिवछत्रपती व श्रीसमर्थांनी या सर्वांच्या रक्षणासाठी जो योग सांगितला तो म्हणजे हिंदवी स्वराज्य योग. श्रीसमर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजीमहाराजांचा केलेला गौरव


शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।
शिवरायांचे कैसे बोलणे । शिवरायांचे कैसे चालणे । शिवरायांची सलगी देणे । कैसे असे ।।
शिवरायांसी आठवावे । जीवित्व तृणवत मानावे । इहलोकी परलोकी उरावे । कीर्तिरूपे ।।

राजा छत्रपती प्रतापसिंहांची रोजनिशी

शुध्ध ३ रविवार नित्यनेम करून बालाजीपंत वैगेरे श्रेष्ठ मंडलीसुधा फराल करून कचेरीस स्वारी येऊन बसली . नंतर बालाजीपंत व विठ्ठलपंतसमेत खासा स्वारी वर खोलीत बोलत बसलो. बालाजीपंत बोलिले किले सारे पाडावे. आम्ही उतर केले की, प्रतापगड देवीची जागा व परली गुरुची जागा हे दोन न पाडावे याप्रमाणे उत्तर केले अथवा इल्पिस्तन याचे विचारास येईल तैसे करावे. किले न पाडावे, याची नावनिसीची याद विठ्ठलपंतास ग्रांटासी बोलावयाची दिली, बि :- किले सातारा व प्रतापगड व परली व प्रचितगड व केळजा येकूण पाच किले न पाडावे. पाच किले यांचे संरक्षणास पाचसे सिबंर्दीत सांभाळतो. हा विच्यार दाजीबा उपाधे व नारायणराव यास विच्यारला. आम्ही बालाजीपंतास किलेप्रकर्णी उत्तरे केली ही ठीक किंवा कसी ? दोघांनी उत्तर केले ठीक आहे.

श्रीशिवरायांसाठी श्रीसमर्थांनी श्रीतुळजाभावानीकडे केलेली प्रार्थना

प्रपंची आमुचे कुळी । तुळजा कुळदेवता । नेणता ऐकिले होते । जाणता स्मरले मनी ।।१।।
श्रेष्ठांची कामना होती । पुर्विली मनकामना । नौस जो नौसिला होता । तो त्यांपासूनि चुकला ।।२।।
पुत्राची घेतला त्यांचा । जोगी करूनि सोडिला । ख्यानति दाविली मोठी । न्यान नीति चुकेचिना ।।३।।
वैराग्य घेतले पोटी । सर्व संसार सांडिला । तुझिया दर्शना आलो । कृपादृष्टी नवाजीलो ।।४।।
तुझा नवाजीला आहे । महंत म्हणती जनी । तुझेची सर्वही देणें ।सर्वही तुजपासुनि ।।५।।
संसारीं मोकळें केलें । आनंदी ठाव दिधला । तोडिली सर्वही चिंता । तू माता सत्य जाहाले ।।६।।
पुर्विले काय मी सांगों । इछा पूर्ण परोपरी । मागील आठवेनासे । केले आश्च्यीर्य वाटले ।।७।।
सदानंदी उदो जाला । सुख संतोष फावला । पराधेनता गेली ।। सत्ता उदंड चालली ।।८।।
उदंड ऐकिले होते । रामासी वरु दिधला । मी दास रघुनाथाचा । मज हि वरदायेनी ।।९।।
श्रेष्ठांचा नौस जो होता । तो मी फेडीनसें म्हणें । पुष्प देउनी उतराई । ऐसे हे कल्पिले मनीं ।।१०।।
तुळजापूर ठाकेना । चालली पश्चिमेकडे । पारघाटी जगन्माता । सद्य येउनी राहिला ।।११।।
ऐसे हे ऐकिले होते । हेत तेथेची पावला । पुष्पाची कल्पना होती । तेथे पुष्प ची दिधलें ।।१२।।
ऐसी तुं दयाळू माता । हेमपुष्पची घेतलें । संतुष्ट भक्तीभावाने । त्रैलोक्यजननी पाहा ।।१३।।
थोड्याने श्ल्याघ्यता केली । थोरसंतोष पावली । उत्तीर्ण काये म्यां व्हावे । तुझे कृपेसी रोकडे ।।१४।।
तुझेच तुजला दिल्हे । म्यां हे कोठुनी आणिले । संकटे वारिली नाना । रक्षिले बहुतांपरी ।।१५।।
जीवीचे जाणते माता । तुं माता मज रोकडी । लोकांच्या चुकती माता । आचुक जननी मला ।।१६।।
येक ची मागणे आतां । द्यावे ते मजकारणें । तुझा तुं वाढवी राजा । सीघ्र आह्मा ची देखतां ।।१७।।
दुष्ट संव्हारिले मागे । ऐसे उदंड एकतो । परंतू रोकडे काही । मूळ सामर्थ्ये दाखवी ।।१८।।
देवाची राहिली सत्वे । तुं सत्व पाहासी किती । भक्तांसी वाढवी वेगीं । ईछा पूर्ण परोपरी ।।१९।।
रामदास ह्मणे माझे । सर्व आतुर बोलणे । क्षमावे तुळजे माते । ईछा पूर्ण ची ते करी ।।२०।।

rss-contact-bottom-img
Language