सज्जनगड

आकल्प सह्याद्रिशिखरस्थान । समर्थस्वामींचे अधिष्ठान ।
संतसज्जन सुख स्वानंदघन । आनंदे उच्छाह करिताती ॥

rss-hero-content-bottom-img
itihas-home-img

इतिहास

itihas-left-img

श्रीसमर्थ रामदास स्वामींनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्व प्रतिपादन प्रतिपादन केले. समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीव श्रीसमर्थांना जाणवली. श्रीसमर्थांना अभिप्रेत असलेला विरक्त हा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून तो कर्तबगार व समाजकार्यासाठी सतत झटणारा असा होता. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती निर्माण करेल असा श्रीसमर्थांचा विश्वास होता. त्यांनी इ. स. १६४४ मध्ये शहापूर जि. सातारा येथे पहिला मारुती स्थापन करून रामदासी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. इ. स. १६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करून संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले. अशा रीतीने रामदासी संप्रदायासाठी संस्थानची स्थापना इ. स. १६४८ मध्ये श्रीरामदास स्वामींनीच केली. हेच संस्थान श्रीरामदास स्वामी संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. श्रीसमर्थ व रामदासी संप्रदायाच्या सामाजिक कार्याचे महत्व ओळखून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी ऑगस्ट १६४९ मध्ये चाफळजवळ शिंगणवाडी येथे श्रीसमर्थांचा गुरुपदेश घेतला.

श्रीरामदासस्वामी संस्थानला हिंदवी स्वराज्यापासूनच राजसत्तेकडून व समाजाकडून सतत पाठिंबा मिळत राहिला आहे. श्रीसमर्थ रामदासस्वामी चाफळहून इ. स. १६७६ मध्ये सज्जनगडावर वास्तव्यास आले. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणजेच सज्जनगडावरील मठ होय. आज ही वास्तू समर्थांचा मठ म्हणून ओळखली जाते. या मठात समर्थांचे वास्तव्य सुमारे ६ वर्ष झाले आहे. राज्याभिषेकानंतर शिवछत्रपतीं समर्थांसमवेत येथे सुमारे दीड महिना राहिलेले आहेत. संभाजी महाराज देखील या मठात सुमारे दोन महिने राहिलेले आहेत. त्यामुळे हा मठ म्हणजे सज्जनगडावरील अत्यंत पवित्र वास्तू होय. या मठातच समर्थांची विश्रांतीची खोली पहावयास मिळते. श्रीसमर्थांचे शेजघर असा फलक खोलीच्या दाराजवळ लावलेला दिसतो. विशेष म्हणजे समर्थांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही या शेजघरात अतिशय व्यवस्थित जतन करून ठेवलेल्या पहावयास मिळतात. या खोलीतील मोठा पलंग खुद्द शिवछत्रपतींनी समर्थांना दिला होता. या पलंगावर समर्थ रामदासांचे एक चित्र आहे. हे चित्र प्रत्यक्ष समर्थांना पाहून त्यांचे शिष्य भीमस्वामी तंजावरकर यांनी काढलेले आहे. समर्थांचे हे चित्र अधिकृत असल्यामुळे त्यांच्या देहयष्टीची कल्पना या चित्रा वरून येते. शेजघरामध्ये एका बाजूला समर्थांनी वापरलेल्या चार वस्तू ठेवल्या आहेत १) छत्रपतींनी दिलेली कुबडी २) श्री दत्तात्रयांनी दिलेली कुबडी ३) वेताची काठी ४) सोटा. समर्थांना शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडी मोठी रहस्यमय आहे. या कुबडी मध्ये तलवार आहे. त्याला गुप्ती असे म्हणतात. गडावरील सेवकांना विनंती केल्यास ते कुबडीतील गुप्ती आजही यात्रेकरूना काढून दाखवतात. शेजघरातच दोन भले मोठे हंडे आहेत. समर्थांचे लाडके शिष्य कल्याणस्वामी या हंड्यातून सामर्थांसाठी रोज परळी गावातून उर्वशी उर्फ उरमोडी या नदीचे पाणी घेऊन येत असत. या हंड्यांच्या बाजूला स्वतः मारुतीरायांनी दिलेली वल्कले असून, ती समर्थांनी वापरलेली आहेत. समर्थांचा पाणी पिण्याचा पितळी लोटा आणि पिकदाणी पलंगा जवळ ठेवलेली आढळतात. कफाची व्यथा असल्यामुळे समर्थ विडा खात असत म्हणून ते पानाचा डबा व पिकदाणी वापरत असत. शेजघरात कट्यावर राममूर्तीचा ओटा आहे समर्थांनी पाच दिवस राममूर्तीची पूजा केलेली आहे. या पलंग समोर एक अग्नी कुंड आहे त्यावरून समर्थ सूर्योदय आणि सूर्यास्त समयी अग्नीची उपासना करत असत.


श्रीसमर्थांनी तंजावरच्या (तामिळनाडू) कारागिराकडून करून घेतलेल्या पंचधातूंच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या मूर्ती या मठातील शेजघरात ठेवल्या होत्या. अखेरचे पाच दिवस अन्नत्याग करून श्रीसमर्थांनी याच मूर्तींचे समोर माघ वदय ९ शके १६०३ (दि. २२ जानेवारी १६८२) रोजी देह ठेवला. मठाचे उत्तरेस एक खळगा होता. तेथे श्रीसमर्थांच्या देहावर शास्त्रोचित अंतिम संस्कार करण्यात आले. हे संस्कार श्रीसमर्थांचे शिष्य उद्धवस्वामी यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी श्रीसमर्थशिष्य कल्याणस्वामी गडावर नव्हते. परंतु शिष्या चिमणाबाई उर्फ आक्काबाई त्यावेळी गडावर होत्या. ज्या जागी अंतिम संस्कार करण्यात आले त्याजागी श्रीसमर्थ समाधी प्रगट झाली व त्याचेवर मंदिर उभारून मंदिरात वरील पंचधातूंच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली.


सज्जनगडावरील श्रीसमर्थांचा मठ, समाधीमंदिर, अंगाई देवी व इतर मंदिरे तसेच भांडारगृह इ. ऐतिहासिक वास्तू या संस्थानाच्या अधिपत्याखाली आहेत. काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत दैनंदिन नित्य कार्यक्रम, गुरुपौर्णिमा, दासनवमी उत्सव, रामनवमी व इतर नैमित्तिक कार्यक्रमांची परंपरा या संस्थानातर्फे गेली ३६६ वर्षे अव्याहतपणे चालू आहे.

rss-contact-bottom-img
Language