संस्थान

सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणि स्वधर्म ।
सत्संग आणि नित्यनेम । निरंतर ।।

rss-hero-content-bottom-img
vyav-home-img

पाणी योजना

सज्जनगड संस्थान पाणीपुरवठा योजना
pani-yojna
नदीचे उदक वाहत गेले। तो ते निरर्थक चालले।
जरी बांधोन काढले। नाना तीरी कालवे।।
उदक निर्गेने वर्तविले। नाना जीनसी पीक काढिले।
पुढे उदकाचे जालें। पीक सुवर्ण।।
– श्रीसमर्थ रामदासस्वामी

सज्जनगडावर नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने कित्येक वर्षे पाणी टंचाई हा गंभीर विषय होता. उपलब्ध होणारे पाणी अशुद्ध असे. तीव्र पाणी टंचाईमुळे उन्हाळ्यात अन्नदान स्थगित करणे, भक्तांनी सज्जनगडावर येऊ नये म्हणून जाहीर करणे, असे वारंवार कटू प्रसंग येत असत. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून संस्थानने शासनदरबारी सातत्याने प्रयत्न सुरु केले. तत्कालीन जलसंपदा मंत्री मा.अजितदादा पवार यांनी

वैयक्तीक लक्ष घालून पाणी पुरवठा योजनेस मान्यता दिली. शासन आणि संस्थानच्या आर्थिक सहभागातून १ कोटी ४३ लाख रुपयांची सज्जनगड संस्थान पाणी पुरवठा योजना २०१२ साली कार्यान्वीत झाली. संस्थानचे विश्वस्त समर्थवंशज श्री.सु.ग तथा बाळासाहेब स्वामी (चार्टर्ड अकौंटंट) यांनी ही योजना प्रस्तावित करून प्रत्यक्षात आणण्यासाठी अविरत प्रयत्न केले. शासनाने पाणी पुरवठा योजना संस्थानच्या ताब्यात दिली आहे. सदर योजने अंतर्गत संस्थान सज्जनगडावर येणाऱ्या हजारो भाविकांना आणि स्थानिक रहिवाश्यांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करीत आहे. संस्थानने पाणी पुरवठा व्यवस्थेत शुद्धीकरण संयंत्र बसविले आहे. या पाणी पुरवठा योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे डोंगरातून चढउतार करीत सहा किमी वरून पाणी सज्जनगडावर पोचते. यासाठी कोठेही विजेचा वापर नाही.

श्रीक्षेत्र सज्जनगडावर २०१३ पूर्वी श्रीरामदासस्वामी संस्थान पिण्याचे पाणी परळी गावातील उरमोडी नदीतून घेत होते. या नदीचे पाणी सज्जनगडावर आणण्यासाठी मोठा पाण्याच्या पंपाचा वापर केला जाई. यासाठी मोठ्या प्रमाणात वीज वापर होत होता. पाणी मोटार पंप बिघडणे, वीज भारनियमन ( लोडशेडिंग ) या कारणास्तव बरेच वेळा पाणी अनियमित व कमी प्रमाणात उपलब्ध होई.

उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांचे सहकार्यातून महाराष्ट्र शासनाचे मंजुरीने पांगरे तलावाचे पाणी सज्जनगड संस्थान पाणी पुरवठा योजना प्रकल्पाद्वारे सज्जनगडावर विना वीज उपलब्ध झाले. सज्जनगड संस्थान पाणी पुरवठा योजना ह्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनातर्फे काही प्रमाणात निधी प्राप्त झाला व उर्वरीत निधी हा श्रीरामदासस्वामी संस्थानने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून श्रीसमर्थभक्तांच्या अमूल्य देणगीतून जमा करून हा प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांचे हस्ते रविवार, दि.३ मार्च २०१३ रोजी झाले.

श्रीक्षेत्र सज्जनगडावरील धाब्याच्या मारुती मंदीरा येथून मागील बाजूस पाहील्यास पाण्याची एक पाईप लाईन मागच्या डोंगरावरून सज्जनगडावर आलेली दिसते. सज्जनगडापासून सहा किलोमीटर पाण्याची पाईप लाईन पांगरे तलाव येथून जोडली आहे. पांगारे तलाव ज्या डोंगरावर आहे तो डोंगर सज्जनगडा पेक्षा ३०० फुट उंच आहे. त्यामुळे तेथून येणारे पाणी विना वीज खर्च करता अर्थात गुरुत्वाकर्षण पद्धतीने सज्जनगडावर आणले जाते. त्यामुळे सज्जनगडावर पाणी पुरवठा अखंडीत होत असतो. पांगारे तलावाच्या जवळपास कोठेही गाव खेडी पाडी नसल्यामुळे संपूर्ण तलावाचे पाणी शुद्ध आहे.

श्रीक्षेत्र सज्जनगडावर एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. श्रीरामदासस्वामी संस्थानने पाणी शुद्धीकरणासाठी पुण्यातील नामांकित कंपनी असीम उर्जा यांचे कडून फिल्टर खरेदी केला आहे. आरोग्य केंद्र परळी जिल्हा सातारा यांचे सुचनेनुसार त्या टाकीत पाणी शुद्धीकरणासाठी लागणारे औषधही योग्य प्रमाणात टाकले जाते व पाण्याचा नमूना तपासणीसाठी पाठविला जातो. पिण्याचे व इतर वापरासाठी लागणारे पाणी याच टाकीतून पुरविले जाते. श्रीरामदासस्वामी संस्थानचे स्वयंपाक घर, यात्रेकरूंची निवास व्यवस्था, यात्रेकरूंसाठी बनविण्यात येणारा श्रीसमर्थ भोजन प्रसादासाठी हे पाणी वापरले जाते. त्याचबरोबर श्रीरामदासस्वामी संस्थान ह्या पाण्याची सोय स्वतः पुरती न ठेवता सज्जनगडावर राहणारे स्थानिक रहिवासी व इतर असे एकूण २६ मीटर धारकांना स्वस्त दरात पाणी पुरवित आहे.

rss-contact-bottom-img
Language